»मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या देशमुख कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजिण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मोदींची सभा महायुतीच्या लातूरसह नांदेड, बीड आणि धाराशिव अशा महायुतीच्या सगळ्या उमेदवारांसाठी असेल, असा दावा करण्यात येत असला, तरी लातूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या लोहा विधानसभा मतदारसंघात सभेच्या नियोजनासाठी भाजपा आग्रही आहे. येत्या मेच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होईल, असा दावाही करण्यात येत आहे.
‘लातूर’मध्ये विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांच्यात लढत होणार आहे. काँग्रेसमधील फुटीनंतर आ.अमित देशमुख आणि भाजपाचे आ.संभाजी पाटील निलंगेकर या दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली असून, सध्या या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. गेल्या दोन टर्मपासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या लातूर लोकसभा या काँग्रेसच्या बालेकिल्यात हॅट्ट्रिक करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोदींची सभा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.