लातूर, दि. २७ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज लातूर शहरातील संत तुकाराम इंटरनॅशनल मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे मतदार जागृती केली. सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत मतदान जागृतीचा संदेश पोहोचविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत संत तुकाराम इंटरनॅशनल मॉडेल स्कूलमधील विद्यार्थी, विद्यार्थ्यांनींना मतदार जागृतीची प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच त्यांच्याकडून संकल्पपत्राचे वाचन करून घेण्यात आले. स्वीपचे नोडल अधिकारी तथा नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, संत तुकाराम इंटरनॅशनल मॉडेल स्कूलचे संचालक बी. ए. मैंदर्गे, उपप्राचार्य राजेंद्र ढिवरे, स्वीप सहायक डॉ. अनिल जायभाये, शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर ढमाले, विजय माळाळे, अमित तुमकुटे, बापुसाहेब रोंगे, मयूर कणसे आदी यावेळी उपस्थित होते.