» मुखपत्र दक्षता वृत्तांत
पुणे / प्रतिनिधी : बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी मतदान यंत्राची पूजा केल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांत प्रसारित झाले. छायाचित्रामध्ये मतदान केंद्रावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या मतदान यंत्रासमोर आरती करताना दिसत आहेत.
याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता.
त्यानुसार सिंहगड पोलीस ठाण्यात ७ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आता मतदान यंत्रांची पूजा करण्यास मतदान केंद्रात सोडल्याप्रकरणी मतदान अधिकारी आणि त्या ठिकाणी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शनिवारी स्पष्ट केले.