घरफोडी करणारे सराईत जेरबंद ; ९ गुन्ह्यांची उकल 

2 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

पिंपरी चिंचवड, ता. ३० (प्रतिनिधी) : हिंजवडी परिसरात चोरी, घरफोडी करणाऱ्या दोन सराईतांना हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या आरोपींनी हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेले घरफोडी, तसेच चोरीच्या ९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधीत राहणारे अभिजीत गोकुळदास मारवाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हिंजवडी पोलीस ठाणे येथे गुरनं ६६९/२०२४, भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सपोनि राम गोमारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून १) दयामान्ना यल्लाप्पा शिवपुरे वय-४२ रा. शिवाजीनगर दत्तमंदीराचे मागे, देहुरोड पुणे, २) दुर्गाप्पा श्रीक्रिष्णा श्रीराम वय-४५ रा. शिरालींग नगर जुना बिडी घरकुल सोलापुर या सराईतांची माहिती मिळवली होती. त्यानुसार पोलिसांनी या दोन्ही सराईत आरोपीना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी / चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आले आहे. उघडकीस आलेल्या गुन्ह्यातील ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा अनेक गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त बापु बांगर, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनात हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषीकेश घाडगे, तपास पथकाचे प्रमुख सपोनि राम गोमारे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली. पोलीस अंमलदार बंडू मारणे,ओमप्रकाश कांबळे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे आदींच्या पथकाने या कारवाईत भाग घेतला होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!