लातूर / प्रतिनिधी : शहर परिसरात नागरिकांना अडवून जबरदस्तीने लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ७ मोबाईल, रोख २८ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून २ गुन्हे उघडकीस आले आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर निवृत्ती बोयणे ( वय १९ वर्षे, रा. शास्त्रीनगर, लातूर ), समीर आजम पठाण ( वय १९ वर्षे रा. शास्त्रीनगर, लातूर ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. गरुड चौक परिसरात के. के. पार्कीगच्या समोर दोघेजण संशयितरित्या थांबल्याचे दिसल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा पाठलाग केला. त्यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण ०७ मोबाईल फोन व रोख रक्कम २८ हजार रुपये मिळून आले. सदर मिळुन आलेल्या मोबाईल व रोख रक्कम याबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, आम्ही दोघेजन व आमचा साथीदार ३. विशाल चंद्रकांत गुळवे रा. इकबाल चौक, लातूर (फरार) असे तिघांनी मिळून दोन महिण्यापुर्वी लातूर ते सारोळा जाणा-या रोडने एक इसम मोटार सायकलवर जात असताना आम्ही आमच्याकडील दोन मोटार सायकलवर त्यांच्या पाठीमागे जावुन त्यास सारोळा रोडवरील शारदा कंस्ट्रक्शन समोर आडवुन त्यांच्याकडील जबरीने रोख रक्कम चोरी केलेली आहे. तसेच आम्ही दोघांनी काल बसवेश्वर चौक ते राजीव गांधी चौक रोडवरील मानकरी पेट्रोल पंपापासुन माताजी नगरकडे जाणा-या रोडने एक इसम मोबाईलवर बोलत जात असताना आम्ही आमच्याकडील दुचाकीवरून त्यांच्या पाठीमागुन जावुन त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यात वापरलेली १ दुचाकी, ७ मोबाईल, रोख रक्कम २८ हजार रुपये असा एकूण १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यातील २ गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार नितीन कठारे, मनोज खोसे, राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, राहुल कांबळे, केंद्रे, अर्जुन राजपुत यांच्या पथकाने केली.