» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / साईनाथ घोणे : दरोडेखोरांच्या टोळीचा महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाभागात बँक, सराफ दुकानावर मोठे दरोडे टाकण्याचा ‘प्लॅन’ होता. या प्लॅननुसार पोलिसांची नजर चुकवत मोठा दरोडा टाकायचा असे नियोजन झाले होते. मात्र, पोलिसांनी बुधवारी त्यांचा हा ‘प्लॅन’ उधळून लावला आहे.
पुणे व लातूर येथील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या टोळीचा महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमाभागातील बँक, सराफा दुकानावर डोळा असल्याचे समोर आले. चौघांकडून दोन पिस्टल, १७ काडतुसे, दुचाकी, खंजर, मिरची पावडर, एक चार चाकी वाहन असा १३ लाख ६४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई स्थागुशाचे पोनि. संजीवन मिरकले, सपोनि विश्वम्भर पल्लेवाड, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, मोहन सुरवसे, राजेश कंचे, योगेश गायकवाड, रवी कानगुले, निटुरे यांच्या पथकाने केली
खबऱ्याने दिली टीप अन् गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उधळला डाव…
स्थागुशाचे पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले यांना खबऱ्याने टीप दिली. लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत अट्टल गुन्हेगार आहेत. निलंगा ते हाडगा जाणाऱ्या रोडवर दरोड्याच्या तयारीतील चार जणांवर छापा मारला. पाचपैकी चौघाना पकडले. एकजण जागेवरच पळाला. खबऱ्याच्या टीपनंतर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दरोडेखोरांचा डाव उधळला.
निलंग्यात टोळीतील ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…
टोळीतील मयुर नितीन आवचारे (वय २६ वर्षे रा. काटीपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी, पुणे), अक्षय रामदास टेकाळे (वय २१ वर्षे रा. काटीपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी, पुणे), विलसन ऊर्फ अविनाश पाथीराज डिमेंन्टी (वय ३१ वर्षे रा. काटीपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी, पुणे), निशांत राजेंद्र जगताप वय ३१ वर्षे रा. बोपोडी सर्वे नंबर २६ भाउ पाटील रोड, पुणे) यांना अटक केली. तर शाम गायकवाड (अंदाजे वय २६ वर्षे रा. बामणी ता. निलंगा जि. लातूर हा फरार झाला. याबाबत निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील मुन्ना जगताप गॅंग टोळीचे सदस्य
महाराष्ट्र- कर्नाटकात दरोड टाकण्यासाठी आलेले टोळीतील दोन गुन्हेगार पुणे येथील मुन्ना जगताप गॅंग टोळीचे सदस्य असून ढमाले गॅंग च्या दिपक कदम याच्या खुन प्रकरणात फरार आरोपी आहेत इतर दोन आरोपी हे एमआयडीसी पोलीस ठाणे लातूर येथील एका खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आहेत. अटक करण्यात आलेल्या टोळीने महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील एखाद्या बँकेवर, सराफ दुकानावर दरोडा टाकण्याचा कट रचला. त्यानुसार दरोडा टाकण्यासाठी पुण्यातून आल्याची कबुली दिली.