लातूर : शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भाजीविक्रेत्याने भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना गुरुवार (दि.२९) रोजी घडली. याप्रकरणी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत शहराचे पोलीस उपाधीक्षक भागवत फुंदे यांनी घटनास्थळास भेट देऊन पोलिसांना सूचना दिल्या. गांधी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल होताच त्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी भाजीविक्रेता अझिम काझी हा भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. २४ वर्षीय तरुणी गुरुवारी सकाळी भाजी खरेदी करण्यासाठी गेली असता भाजी विक्रेत्या आरोपीने छेड काढली. तिने घरच्याना सदर घटनेबाबत सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीने दिलेला जबाब नोंदवून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल पवार करत आहेत.